सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील आस्थापनेवरील दोन कार्यालयीन अधीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती देण्यास महाराष्ट्र शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. यामध्ये विनोद कुलकर्णी आणि युवराज गाडेकर यांचा समावेश असून, नगर विकास विभागाने आज मंगळवारी याबाबत शासन निर्णय जारी केला. विशेष म्हणजे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थानिक आस्थापनेतील अधिकाऱ्यांना संधी मिळाली. महापालिका प्रशासनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२२ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील तरतुदीनुसार ही पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. सहायक आयुक्त पदाची वेतनश्रेणी ४१,८०० ते १,३२,३०० रुपये अशी आहे.या पदोन्नतीसाठी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत शिफारस करण्यात आली होती.
यानुसार महानगरपालिकेमधील कार्यरत २ कार्यालयीन अधीक्षक यांना सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संदर्भाधिन दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये शासनाकडे सादर केला आहे.
महानगरपालिकेच्या प्रशासकीय ठरावानुसार प्रस्ताव महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडे
पाठविण्यात आला होता. शासनाने सर्व बाबींची पडताळणी करून दोन्ही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीस मान्यता दिली. शासनाच्या आदेशानुसार आता महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुढील प्रशासकीय कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी पदोन्नतीचे आदेश निर्गमित करावेत, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार हा शासन निर्णय जारी केला आहे. भूमी मालमत्ता विभागाचे अधीक्षक विनोद कुलकर्णी आणि मिळकत कर विभागातील अधीक्षक युवराज गाडेकर या दोन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे महापालिका प्रशासनात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी गाडेकर आणि कुलकर्णी यांचा पुस्तक देऊन सत्कार केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, लिपिक परमेश्वर सुळगावकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थानिक अधिकाऱ्यांना संधी
सोलापूर महानगरपालिकेचा आकृतीबंध २८ डिसेंबर २०२१ रोजी, तर सेवा प्रवेश नियमांना १५ डिसेंबर २०२२ रोजी शासनाची मंजुरी मिळाली होती. या आकृतीबंधानुसार सहायक आयुक्तांची सहा पदे मंजूर आहेत. त्यापैकी पात्र ठरलेल्या दोन कार्यालयीन अधीक्षकांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तातडीने राज्य शासनाकडे पाठविला. पाठपुरावा केला.
तत्कालीन उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तयार केला होता. राज्य शासनाने अखेर या पदोन्नतीस मंजुरी दिली.
विशेष म्हणजे, सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थानिक आस्थापनेतील अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी पदोन्नतीची संधी मिळाली आहे.
Post Views: 7