पंढरपूर – कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यातून मंगळवेढा वितरिका क्रमांक १ व २ तसेच उमदी वितरिकेवरील लघुवितरिकांच्या माध्यमातून शिरनांदगी, मारोळी, लवंगी व पडोळकरवाडी येथील तलाव भरून देण्यासाठी थेट बंदिस्त नलिकेद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित गावांतील तलावांमध्ये पाणी आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाला म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा वितरिका क्रमांक १व २ , उमदी वितरिकेवरील लघुवितरिका तसेच मारोळी, शिरनांदगी,पडोळकरवाडी लवंगी हे चार तलाव जत मुख्य कालव्यावरून थेट बंदिस्त नलिकेद्वारे भरण्याच्या दृष्टीने सरकार व जलसंपदामंत्री यांच्याकडे आ आवताडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर शासनाकडून दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मंजुरी मिळाली आहे. सदर काम करण्याकरता १८०० एम एम व्यासाच्या बंदिस्त मालिकेद्वारे जत मुख्य कालव्याच्या किमी ७२ मधून पाणी घेणे प्रस्तावित आहे. मंगळवेढा तालुक्यातील उपरोक्त तीन वितरिका व चार तलाव यासाठी ४६ किमी लांबीची बंदिस्त नलिका व त्यासाठी एकूण १७० कोटी खर्च अपेक्षित आहे. सदर कामाचा समावेश कृष्णा-कोयना प्रकल्पाच्या प्रस्तावित सहाव्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाचा सहावा सुप्रमा राज्य तांत्रिक सल्लागार समिती (SLTAC) यांचेकडून मान्यता मिळाले नंतर सविस्तर तांत्रिक मान्यता घेऊन निविदा काढण्यात येणार आहे. या कामासाठी संबंधित कामाचे सविस्तर सर्वेक्षण करून शासनाच्या प्रचलित पद्धतीनुसार पुढील मान्यतेची कार्यवाही केली जाणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाला सिंचनाचा लाभ मिळावा आणि तलावांमध्ये पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. शिरनांदगी, मारोळी, लवंगी आणि पडोळकरवाडी येथील तलावांना थेट बंदिस्त नलिकेद्वारे पाणी मिळाल्यास परिसरातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच जत तालुक्यातील मुख्य कालव्यातील मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात मिळणारे पाणी अत्यंत कमी दाबाने व खंडितपणे मिळत होते ते आता पुरेशा दाबाने व अखंडित मिळणार आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून वितरिका क्रमांक एक वितरिका क्रमांक दोन आणि उमदी डी वाय वरून मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील १९ गावांना तसेच पडोळकरवाडी, शिरनांदगी,लवंगी आणि मारोळी या चार साठवण तलाव भरून घेण्यासाठी याचा फायदा होणार आहे. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचे सहकार्य लाभल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले.
Post Views: 10