
सोलापूर – माढा तालुक्यातील गार अकोले परिसरात झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. व कृषी तसेच महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल
सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, तालुका कृषी अधिकारी चंदन, नायब तहसिलदार विजय कवडे, नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडल अधिकारी भगवान मुंडे, तलाठी बाळासाहेब कांबळे, वैभव पाटील, बोऱ्हाडे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी संबंधित कृषी अधिकारी व महसूल विभागाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टी व वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची योग्य नोंद घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. शेतकऱ्यांनी धीराने परिस्थितीला सामोरे जावे व प्रशासनाकडून आवश्यक ती मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी आतापर्यंत ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे तातडीने करण्यात येतील. जिल्ह्यात जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार सुमारे ६ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झालेले आहे, असे सांगितले.
चौकट
ही आहे शेतकऱ्यांची मागणी
अतिवृष्टी व वादळी पावसामुळे केळी व डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले. या परिसरात ३०० ते ४०० एकरांवर केळीची लागवड झाली असून प्रत्येकी एकरी २.५० ते ३ लाख रुपये खर्च झाला. अतिवृष्टी व वादळी पावसामुळे फळबागांचे १०० टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी शेतकरी किसन देवकते, प्रकाश केचे, धनंजय वाळेकर, वामन देवकाते व अशोक केचे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करून, संवाद साधून धीर दिला.





















