सोलापूर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार पेठ आणि सात रस्ता परिसरातील महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीर्ण व धोकादायक निवासस्थानांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश महापौर विनायक कोंडयाल यांनी दिले.
बुधवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, भरतसिंग बडूरवाले, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, कामगार नेते अशोक जानराव, जनार्दन शिंदे,चांगदेव सोनवणे , सायमन गट्टू, बापूसाहेब सदाफुले, प्रवीण कांबळे, बाळासाहेब सुरवसे, अश्विनी चव्हाण, शेषराव शिरसट, प्रीती उडाणशिवे, दशरथ अडकूल, सुभान स्वाके, पी. पी. जाधव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत दोन्ही ठिकाणच्या महानगरपालिकेच्या निवासस्थानांची सद्यस्थिती, त्यांची जीर्ण अवस्था आणि पावसाळ्यात संभाव्य धोके यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणतीही दुर्घटना घडू नये आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध पर्यायी निवासव्यवस्थांचा आढावा घेण्यात आला. सुरक्षित आणि सुसज्ज निवास उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कटिबद्ध असून, पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण करून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे बैठकीत महापौरांनी स्पष्ट केले.
संबंधित कर्मचाऱ्यांनी त्वरित सुरक्षित
ठिकाणी स्थलांतर करावे
संबंधित कर्मचाऱ्यांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पर्यायी निवासव्यवस्था स्वतः करावी किंवा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या निवासस्थानी जावे. प्रशासनाने ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवून पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती पूर्णपणे रिकाम्या करण्याचे आदेशही महापौर कोंडयाल यांनी दिले.
Post Views: 11