सोलापूर : चिंचोळी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस एमआयडीसी विभाग, सांगलीचे कार्यकारी अभियंता श्री. सु. वि. कोलप, उपअभियंता श्री. प्रदीप खंदारे तसेच एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. शिवाजी राठोड उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. डी. राम रेड्डी यांनी चिंचोळी औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांची सद्यस्थिती मांडली. या प्रश्नांमुळे उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी विशद करताना औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि प्रलंबित प्रश्नांचे प्राधान्याने निराकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी असोसिएशनच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्नांबाबत तयार करण्यात आलेल्या निवेदनातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्राशी निगडित विषयांवर स्वतंत्र पत्रे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली, जेणेकरून संबंधित विषयांवर आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही करता येईल.
तसेच, काही प्रश्न हे धोरणात्मक स्वरूपाचे असल्याने ते संबंधित वरिष्ठ यंत्रणांकडे आवश्यक शिफारशींसह पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले आहेत. या विषयांवरही असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.
बैठकीत उपस्थित एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मांडण्यात आलेल्या प्रश्नांबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शविली. चिंचोळी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून पुढील कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
चिंचोळी औद्योगिक क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास, उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण या उद्देशाने सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन सातत्याने कार्यरत आहे. या अनुषंगाने संबंधित शासकीय व प्रशासकीय यंत्रणांकडे नियमित पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, असे असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.























