अकलूज – उजनी धरण परिसरातील प्रस्तावित AI डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, फ्लोटिंग सोलर, बॅटरी स्टोरेज आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त डॉ. अनिल काकोडकर समितीची पुनर्रचना करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे केली
समितीत जलसंपदा, पर्यावरण, कृषी, मत्स्यव्यवसाय आणि अणुसुरक्षा क्षेत्रांतील स्वतंत्र तज्ज्ञांसह शेतकरी, मच्छीमार व प्रकल्पप्रभावित नागरिकांचा समावेश करावा. नागरिकांच्या प्रश्नांना ‘गैरसमज’ न मानता वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे त्यांचे निराकरण करावे, असेही पत्राद्वारे सुचवले आहे.
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, सिंचन, शेती आणि मत्स्यव्यवसायासाठी महत्त्वाचे असल्याने प्रस्तावित प्रकल्पांचा जलसुरक्षा व पर्यावरणावर होणारा एकत्रित परिणाम शास्त्रीय पद्धतीने तपासावा, अशी मागणी त्यांनी केली.
काकोडकर समितीचा मसुदा अहवाल सार्वजनिक करून जनसुनावणी घ्यावी आणि नागरिकांच्या हरकती-सूचनांचा विचार करून अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा. तसेच, ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत प्रस्तावित डेटा सेंटर हबच्या धोरणाचा जलउपलब्धता व पर्यावरणीय क्षमतेच्या आधारे पुनर्विचार करावा, असेही त्यांनी सुचविले.
Post Views: 9