बार्शी – पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी बार्शी शहर व तालुक्यातील २० मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. शिक्षक मतदारसंघासाठी ९२.६६ टक्के, तर पदवीधर मतदारसंघासाठी ८३.५२ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ११ पोलीस अधिकारी आणि ७६ पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले होते.
बार्शीचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील २० मतदान केंद्रांपैकी सहा केंद्रे शहरात तर १४ केंद्रे ग्रामीण भागात होती. क्षेत्रीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले आणि गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी काम पाहिले.
शिक्षक मतदारसंघात १,६४८ मतदारांपैकी १,५२७ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १,१३४ पुरुष आणि ३९३ महिला मतदारांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघात ३,९९९ मतदारांपैकी ३,३४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २,६६९ पुरुष आणि ६७१ महिला मतदारांचा समावेश आहे.
२० मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त
उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर, तालुका पोलीस ठाणे, वैराग पोलीस ठाणे, पांगरी पोलीस ठाणे यांच्या पथकांनी बंदोबस्त ठेवला. मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिसांनी नियोजन केले होते.
चौकट —
आंधळकरांच्या बोटावर शाई नसल्याने खळबळ
पदवीधर मतदारसंघातील बार्शीचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी महाराष्ट्र विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले. मात्र मतदानानंतर पत्रकारांना बोट दाखवताना त्यांच्या बोटावर शाई नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा मतदान केंद्रात जाऊन बोटाला शाई लावून घेतली. या प्रकारावर संताप व्यक्त करत त्यांनी बोगस मतदानाला वाव मिळत असल्याचा आरोप केला. प्रत्यक्ष उमेदवाराच्या बोटावरच शाई लावली जात नसेल, तर इतर मतदारांच्या बाबतीतही दुबार-तिबार मतदानाची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी म्हटले. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेतील दक्षतेबाबत प्रश्न उपस्थित झाले.
Post Views: 10