बार्शी – कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करुन बंधपत्र घेतल्यानंतरही त्याचे उल्लंघन करून पुन्हा गुन्हा करणाऱ्या इसमाविरूद्ध बार्शी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. अरवाज रज्जाक सय्यद (वय २२, रा. मांडगे चाळ, बार्शी) याची सोलापूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाविरूद्ध कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १२६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी सादर केला होता. त्यानुसार सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत २५ हजार रुपयांचे अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते.
मात्र, बंधपत्राच्या कालावधीत संबंधित इसमाने पुन्हा गुन्हा केल्याने त्याच्याविरूद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५ (२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल झाला. यामुळे प्रतिबंधात्मक बंधपत्राच्या अर्टीचे उल्लंघन झाल्याचा अहवाल संबंधित प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला.
या प्रकरणात बंधपत्राचे उल्लंघन केल्याबद्दल २५ हजार रुपयांचा दंड भरण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, संबंधित इसम दंडाची रक्कम भरण्यास तसेच योग्य जामीन देण्यास असमर्थ ठरल्याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार त्याला २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सोलापूर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस अंमलदार सचिन राऊत, निर्खिल बदाले, गणेश बांगरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.
प्रतिबंधात्मक बंधपत्राच्या अर्टीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बार्शी शहर पोलिसांनी दिला आहे.
Post Views: 14