जालना – जगातील सर्वाधिक खडतर आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल मधील भागीरथी नदी येथे होणाऱ्या 81 किलोमीटर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी जालन्याचे अष्टपैलू खेळाडू आयर्न मॅन कैलास झोळगे यांची निवड झाली आहे.
पश्चिम बंगाल येथे येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी जागतिक पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या एकमेव सर्वात लांब अंतराची स्पर्धा संपन्न होणार आहे. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) स्विमिंग यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मुर्शिदाबाद येथील एरन बार्रेज घाट जागीपूर ते गोरबाजार सदर घाट बहरामपूर असे 81 किमी भागीरथी नदीच्या विस्तीर्ण पात्रात ही जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.वेगवान पाण्याचा प्रवाह व विस्तीर्ण पात्र आणि तब्बल 81 किलोमीटरचे अंतर अशा अत्यंत कठीण परिस्थितीत सलग पोहण्याचे आव्हान व शारीरिक कसोटीची परीक्षा होणार असून स्पर्धेत सहभागी जलतरणपटूंना कस लागणार आहे.”मिशन भागीरथी 81″ या स्पर्धेसाठी कैलास झोळगे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कठोर सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तयारीवर विशेष भर दिला आहे. राष्ट्रीय तसेच खुल्या पाण्यातील विविध स्पर्धांमधील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे त्यांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
निवडीबाबत प्रतिक्रिया देताना कैलास झोळगे म्हणाले, “भागीरथी नदीतील ८१ किलोमीटरची ही स्पर्धा जगातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धांपैकी एक मानली जाते. अशा ऐतिहासिक स्पर्धेत जालना जिल्ह्याचे (महाराष्ट्र राज्याचे) प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.मी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्ण तयारी केली असून दररोज पाच ते सात तास पोहण्याचा व स्ट्रेंथ ट्रेनिंगचा सराव केला आहे. त्यामुळे उत्कृष्ट कामगिरी करून पदक मिळवणे हेच माझे ध्येय आहे.” कैलास झोळगे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, जालना जिल्हा जलतरण संघटना, विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे जालना जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून जिल्ह्यातील युवा जलतरणपटूंना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.





















