पंढरपूर – विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा अखेरच्या टप्प्यात चांगलीच रंगतदार झाली. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नां ऐवजी चक्क राजकीय आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान झाडल्या गेल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अखेरच्या दिवशी या निवडणूकी मध्ये पैशाची वारेमाप उधळण झाल्याची देखील चर्चा रंगू लागली आहे. लक्ष्मीदर्शना मुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारांची चांगलीच चंगळ झाली असून दिवाळी अगोदरच मतदारांची दिवाळी झाल्याची मतदार बांधवांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान पेटीत बंद झाले असून येत्या २७ तारखेला या मधील कोणता उमेदवार बाजी मारणार याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी बारापर्यंत पदवीधर मतदारसंघात २५ टक्के तर शिक्षक मतदारसंघात ३० टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच निवडणूकीच्या रिंगणातील मातब्बर उमेदवारांमुळे आखाड्यात निवडणूकीतील रंगत वाढली गेली. त्यामुळे या निवडणुकीकडे पुणे विभागातील पदवीधर तसेच शिक्षकां बरोबरच सर्वसामान्यांचे देखील लक्ष लागले होते.
या निवडणुकीत भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने उमेदवारी मागे घेतली असली, तरी गनिमी काव्याने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला. माजी आमदार दत्तात्रय सावंत यानी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर स्वेरी महाविद्यालयाचे सर्वेसर्वा असलेले डॉ. बी. पी. रोंगे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
—————————
चौकट : ( पंढरपूर तालुक्यातील दोन उमेदवारांमुळे चुरस )
दरम्यान माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा मतदारांशी असलेला संपर्क तसेच डाँ.बी.पी. रोंगे यांनी मागील दोन वर्षांपासून या मतदारसंघाचा अभ्यास करीत मतदारसंघात दौरे करुन निवडणूकीच्या काळात शिस्तबध्द प्रचार यंत्रणा राबविल्याने या दोन्ही उमेदवारांच्या उमेदवारीमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे दिसून आले. या बरोबरच पुणे विभागातील शिक्षक मतदारांचे सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: पंढरपूर तालुक्यातील या दोन्ही शिक्षक उमेदवारांनी लक्ष वेधून घेतलेले या निमित्ताने दिसून आले.
———————-
चौकट : ( दिवाळी अगोदरच मतदारांची दिवाळी )
या निवडणूकीत सुरुवाती पासूनच वारेमाप पैशाची उधळण होत असल्याचा आरोप,प्रत्यारोप ऐकावयास मिळत होते. त्यातच निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी पदवीधर तसेच शिक्षक मतदारांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन घडविल्याची देखील चर्चा रंगलेली ऐकावयास मिळाली.. त्यामुळे या निवडणूकीच्या निमित्ताने मतदारराजाची दिवाळी पूर्वीच चांगली दिवाळी साजरी झाल्याचे दिसून आले. या निवडणूकी मध्ये उमेदवारांकडून साम,दाम आणि दंड नितीचा वापर झाल्यामुळे येत्या २७ तारखेला नेमकी कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
————————–
चौकट : ( रोंगे, सावंत यांनी बजाविला मतदाना अधिकार )
पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविणारे डाँ.बी.पी.रोंगे यांनी पंढरपूर शहरातील द.ह.कवठेकर प्रशाले मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. तर दुसरे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी पुळूज येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला.
————————
चौकट : ( भाजपसाठी प्रतिष्ठेची, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई )
या निवडणुकीकडे भाजपने प्रतिष्ठेची, तर शिवसेनेने राजकीय अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिल्याचे चित्र होते. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. या नेत्यांच्या सहभागामुळे निवडणुकीतील राजकीय चुरस आणखी वाढली.
———————
चौकट : ( लक्ष्मी दर्शनाचे आरोप )
मतदानाच्या अखेरच्या दिवशी पैशांच्या वाटपावरून अर्थात ‘लक्ष्मीदर्शना’च्या चर्चेला उधाण आल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) उमेदवार तथा माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केला. दुसरीकडे, अपक्ष उमेदवार डॉ. बी.पी.रोंगे यांनी निवडणूकीच्या निमित्ताने होत असलेल्या लक्ष्मीदर्शनाचा आरोप करीत आमच्या स्वाभिमानी शिक्षकांना कितीही आमिषे दाखविली तरी ते सददविवेक बुध्दीनेच मतदान करतील. त्यामुळे येथे लक्ष्मी ही सरस्वतीवर निश्चितच भारी पडणार नाही असा विश्वास देखील रोंगे यांनी व्यक्त केला.
Post Views: 6