बार्शी – जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरवपूर्वक आढावा घेण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘लोकशाहीर’ का म्हटले जाते, याचे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. समाजजागृतीसाठी शाहिरीचा प्रभावी वापर करत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण, समता आणि मानवतेचा संदेश दिला. महापुरुषांचे विचार जीवनात रुजवून त्यानुसार आचरण करणे, हाच त्यांच्या स्मृतीला खरा आदर असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. सुवर्णा देवकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेचा व जागतिक कीर्तीचा उल्लेख करत, त्यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करुन महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेचा गौरव वाढविल्याचे सांगितले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
गणेश वडेकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन दिला. काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिवा वर्षा घाडगे, प्र.अ. किशोर कदम, फिजिकल कोच जे. बी. शिंदे (मेजर), सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारस कांबळे यांनी केले.