सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात दि. २२ ऑक्टोबर २०२६ पासून *’शेतकरी खत माहिती व्यवस्था’* या संगणकीय पद्धतीद्वारे खत वाटप सुरू झाले आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना उपलब्ध खत साठ्याची माहिती भ्रमणध्वनीवर मिळणे तसेच, आपल्या शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार खताची आगाऊ नोंदणी करणे शक्य होणार आहे. खत खरेदीची कार्यवाही अधिक सोपी, खुली आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले.
श्री. काटकर हे दि. २७ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, सोलापूर येथे कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच, जिल्ह्यातील खताचे घाऊक विक्रेते, खत कंपनी व्यवस्थापक यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, शेतकरी बांधवांनी संगणकीय खत वाटप पद्धतीचा लाभ घेऊन खत खरेदी करावी. ही कार्यवाही सोपी असून जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ खत विक्रेते, खत पुरवठादार कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक तसेच कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.
कंपनी व्यवस्थापक व घाऊक विक्रेत्यांनी किरकोळ विक्रेत्यांना खते वाटप करताना ठरलेल्या वेळेत पोचपावती देऊन सदर साठा विक्री नोंदणी यंत्रावर वर्ग करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सदर खत साठा ठरवून दिलेल्या संगणकीय पद्धतीद्वारेच विक्री करावा, जेणेकरून खत टंचाई होणार नाही.
तसेच सवलतीच्या खतांचा साठा वळवणे, छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, विक्री यंत्र व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विना सवलतीच्या खतांची सक्तीने जोडविक्री करणे अशा बाबी निदर्शनास आल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी गुणवत्त्ता नियंत्रण तपासणीसांना दिल्या.
आढावा सभेमध्ये उमेश काटे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर यांनी घाऊक विक्रेते तसेच, सर्व गुणवत्ता नियंत्रण तपासणीस व खत कंपनीचे प्रतिनिधी यांना या पद्धतीचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी जिल्ह्यातील खत साठ्याबाबत सविस्तर माहिती मांडली. तसेच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुद्धाचार्य भोसले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मोहीम अधिकारी अजय वगरे यांनी सभेची ओळख तसेच आभार मानून सभेची सांगता केली.
या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरी हावळे, जिल्हा कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणवत्त्ता नियंत्रण तपासणीस व तालुक्यातून आलेले तपासणीस तसेच, जिल्हाभरातून खताचे घाऊक विक्रेते, कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
Post Views: 7