सोलापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडून निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या लाभार्थ्यांनी १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संबंधित बँकेत हयातीचे दाखले जमा करावेत. मुदतीत दाखले जमा न केल्यास संबंधितांचे नोव्हेंबर २०२६ पासूनचे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, असे आवाहन प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी केले आहे.
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या निवृत्तीवेतनधारकांनी ज्या बँकेतून पेन्शन घेतली जाते, त्या बँकेत प्रत्यक्ष जाऊन हयातीच्या दाखल्याच्या यादीवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. यावेळी यादीवर अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. तसेच वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्मदाखला यापैकी संबंधित कागदपत्रे पेन्शन कक्ष, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर येथे प्रत्यक्ष जमा करावीत. हयातीचे दाखले जमा करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२६ आहे. या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे निवृत्तीवेतन थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित सेवानिवृत्त सेवक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी वेळेत आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पेन्शन वितरण करणाऱ्या संबंधित बँकांनी हयातीच्या दाखल्यांची यादी एकत्रित करून २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पेन्शन कक्ष, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, नवी पेठ, सोलापूर येथे पाठवावी, असेही प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी म्हटले आहे.
Post Views: 3